आठवणीतील ‘योगेशभाऊ मानकर’

एखाद्या व्यक्तीची सामाजिक, वैचारिक प्रतिमा घडण्यासाठी बालमनावर काही व्यक्तींचा नक्की प्रभाव झालेला असतो. माझ्या बालपणी मनावर प्रभाव झालेल्या अनेकांपैकी एक म्हणजे योगेश भाऊ. योगेश भाऊंचा निर्भीडपणा, धाडसी, करारी स्वभाव माझ्या मनाला बालपणीच भावला होता. बाजार पट्ट्यातील हनुमान मंदिरातील शनिवारच्या आरतीनंतर थोडावेळ राष्ट्रीय विषयावर चर्चा व्हायची. त्याठिकाणी खास योगेश भाऊंना ऐकण्यासाठी मी आवर्जून जायचो. एखाद्या दिवशी योगेश भाऊ आले नाही की मन नाराज व्हायचे. त्यावेळेस संघ, बजरंग दल, हिंदुत्व असे फार काही कळत नव्हते. परंतु ही लोक देशहितासाठी काहीतरी मोठ काम करतात हे लक्षात यायचे. जसजसा मोठा झालो तसा योगेशभाऊ सोबत चांगली ओळख झाली. 

एकदा रामनवमी मिरवणुकीत ‘बनाएंगे मंदिर’ गाणे लावले म्हणून पोलिसांनी बँड जप्त केला. अनेक विनंत्या करूनही ते बँड देईना. पोलिस स्टेशनसमोर मोठी गर्दी जमली होती. सामंजस्याची भूमिका घेऊन पोलिस ऐकत नाही हे पाहून योगेशभाऊ आपल्या काही कार्यकर्त्यांसह आत गेले आणि “बँड देता... का आम्ही सामूहिक बनायेंगे मंदिर म्हणू?” असा धमकीवजा इशाराच पोलिसांना दिला. योगेशभाऊंची आक्रमक भूमिका पाहून कार्यकर्त्यांना जोश आला. सगळेजण ‘जयश्रीराम’ घोषणा देऊ लागले. तेव्हा कुठे पोलिसांनी काही अटी घालून बँड पुन्हा दिला. अशी ही योगेश भाऊची आक्रमकता मी स्वतः पाहिली. असा आक्रमक कार्यकर्ता मात्र अल्पायुषी ठरला याचे खूप वाईट वाटते. 

योगेश भाऊ १९९८ ते २००१ या दरम्यान संघाच्या संपर्कात येऊन सक्रिय कार्यकर्ता झाले. रामेश्वर नाना बोराडे त्यावेळी संघाचे तालुका प्रचारक होते. ते सोयगाव येथे प्रवास करत. त्यांच्या प्रयत्नातूनच तेव्हा योगेश भाऊ मानकर, राजूभाऊ फुसे, विश्वनाथ दादा कोथळकर, ईश्वरभाऊ उसरे, सुनील भाऊ गावंडे, आत्मारामजी बाविस्कर ही नवीन तरुण टीम सोयगावात संघकामात सक्रीय झाली होती. 

रामेश्वरनाना यांनी योगेश भाऊंच्या निधनाची बातमी ऐकून खास आठवण लिहून पाठवली. ते म्हणतात, “योगेश अतिशय धाडसी, कोणत्याही कामासाठी कायम तयार आणि हिरीरीने पुढाकार घेणारा कार्यकर्ता होता. कारणे सांगत बसने त्याच्या स्वभावात नव्हते. सावळादबरा येथील संघ शाखेवर जिहाद्यांचा हल्ला असो की कंकराळा येथील धर्मांतराचे प्रकरण असो योगेशने आक्रमक भूमिका घेतली. रात्री अपरात्री मला घ्यायला खेडोपाडी यायचा. मी त्याला म्हणायचो सोबत कोणाला आणत जा. तर म्हणायचा मी मारणारा भीत नाही नाना. असा हा कार्यकर्ता निघून गेला विश्वास बसत नाही.” 

त्यानंतर भूषणजी गाजरे हे संघाचे तालुका प्रचारक म्हणून आले होते. त्यांनीही योगेशभाऊ विषयी आठवणी लिहून पाठवल्या. ते म्हणाले, “मी आलो तेव्हा योगेशकडे बजरंग दलाचे काम होते. वेताळवाडी जवळील दर्ग्याचे प्रकरण आणि फर्दापूर येथील लव जिहाद प्रकरणात त्याने योग्य भूमिका घेतल्यामुळे दोन्ही विषय मार्गी लावले होते. तालुक्यात घडणाऱ्या गोष्टींवर त्याचे बारीक लक्ष असायचे. काहीही बातमी कानावर आली की तत्काळ त्याची शहानिशा करून घ्यायचा आणि लगेच भूमिका घ्यायचा. त्याच्या बोलण्यात प्रखर हिंदुत्वाची झलक आणि एका हाकेवर पोरं गोळा करण्याचे कौशल्य त्याच्याकडे होते...” 

योगेशभाऊंनी संघटन आणि आंदोलनासोबत साप्ताहिक विवेक आणि तरुण भारत सोबतही काम केले. आपल्या हिंदुत्ववादी विचारांना त्यांनी लेखणीच्या माध्यमातूनही धार देण्याचे काम केले. याच कामाची पोचपावती म्हणून तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शनजी यांनी त्यांना नागपूर येथे भेटीसाठी बोलावले होते. तिथे संघ अधिकारी आणि वरिष्ठांचा दोन दिवस त्यांना सहवास लाभला. तसेच रामसेतु आंदोलनातील त्यांचा सहभाग सुद्धा विसरता येत नाही. तत्कालीन सरकारच्या रामसेतु विरोधी भूमिकेविरुद्ध देशभर आंदोलन सुरू होते. सोयगाव येथे योगेशभाऊ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडले. केवळ ek दिवस आंदोलन करून थांबले नाही, तर काही निवडक कार्यकर्त्यांसह त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि तिथेही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 

अशा अनेक आठवणी त्यांच्या आहेत. हिंदुत्वाच्या भूमिकेबद्दल त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे मित्र सांगतात की त्याला राजकारणात जाऊन परिवर्तन घडवण्याची ओढ खूप जास्त होती. तरीही तुझा पिंड राजकारणाचा नाही, समाजकारणाचा आहे असे अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांनी सांगूनही त्यांना मोह आवरला नाही. त्यांनी नगर पंचायत निवडणुकीत विजय मिळवला खरा पण तिथूनच त्यांच्या नशिबाला जणू उतरती कळा लागली. एका अपघातात एक हात कायमचा अपंग झाला. कित्येक उपचार करूनही त्यांना बरे वाटले नाही. आणि आयुष्यातून खचतच गेले. 

मागील वर्षभरात योगेशभाऊसोबत भेटीचे गप्पा गोष्टीचे अनेक प्रसंग आले. त्यांच्या बोलण्यात एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती. आपल्याकडे जास्त वेळ नाही याची त्यांना जाणीव झाली होती. आता इच्छा असूनही धर्मासाठी, संघटनेसाठी तुमच्यासोबत काम करता येत नाही अशी खंत ते अनेकदा बोलून दाखवत. पण नवीन युवा कार्यकर्त्यांमध्ये बसणे, त्यांच्यासोबत थोडाफार प्रवास करणे, योग्य तिथे सल्ला देणे त्यांना आनंद देऊन जाई. समर्पण कार्यालयाच्या उद्घाटनाच्या आदल्या रात्री १२.०० वाजता भाऊ कार्यक्रम स्थळी आले. त्यांना पाहून मी जवळ गेलो म्हटले, “भाऊ काय झाले.? एवढ्या रात्री का आले?” म्हणे, “काही नाही. झोप लागत नव्हती. तुमच्यात मी कुठी दिसतो का ते पाहू राहलो” असे ते म्हणाले. त्यांना नवीन तरुण कार्यकर्ते जोमाने काम करत असल्याचे पाहून आनंद वाटायचा. नुकत्याच झालेल्या हिंदू संमेलनाच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी स्वतः उपस्थित राहून देखरेख केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केलं. 

आठवणी खूप आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सोबत काहीना काही चांगले प्रसंग नक्कीच घडले आहेत. पण सगळेच मांडणे निव्वळ अशक्य आहे. तथापि, योगेश भाऊंचे एक वाक्य मात्र चांगले लक्षात राहिले. राजू भाऊच्या टपरी जवळ बसलेलो असताना एकदा ते म्हणाले की, “मी आयुष्यात कधीच मरायले घाबरलो नाही. फक्त प्रभू रामचंद्र्रावळ एकच इच्छा आहे. पुन्हा हिंदू धर्मात जन्माले घाल अन् संघाचा स्वयंसेवक कर. जे काम राहेल आहे ते करून घे.” तेव्हा त्यांच्या शब्दाचा एवढा विचार केला नव्हता. पण आज त्यांची सल जाणवते आहे. “हम दिन चार रहे न रहे, तेरा वैभव अमर रहे मां.” हीच त्या प्रामाणिक स्वयंसेवकाची भावना होती. 

जय श्रीराम योगेश भाऊ...🙏🚩

तुमचा लहान भाऊ – कल्पेश जोशी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

स्वामी रामानंद तीर्थ - बालपण ते संन्यास