लिब्रांडू जमातीची दिवास्वप्ने
बांगलादेश, नेपाळ मध्ये हिंसक मार्गाने सत्तांतर घडवले तसे भारतातही झाले पाहिजे किंवा होईल अशी दर्पोक्ती काही जण करत असतात. त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांसह डावे पुरोगामी लिब्रांडू सुद्धा आहेत. आता व्हेनेन्झुएला मध्ये झालेली हिंसक घडामोडी पाहता भारतात सुद्धा व्हेनेंझुएला सारखे होईल अशी भाषा होत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा बरळले आहेत. मुळात या लोकांना भारताच्या संविधानावर विश्वास नाही, की भारताची लोकशाही संपवायची आहे तेच कळत नाही. आपल्या हातची सत्ता गेली आणि जनतेने घरी बसवले की लोकशाहीविरोधी मार्गाने सत्ता काबीज करण्याची काँग्रेसची मानसिकता नवी नाही. इंदिरा गांधींनी तेच केले होते आणि देशात आणीबाणी लादून संविधानाचा गळा घोटण्याचे पाप केले होते.
आजची काँग्रेस, डावे, पुरोगामी तेच स्वप्न पाहत आहे. परंतु खरच असे शक्य आहे का? दिल्ली दंगल असो, शाहिनबाग आंदोलन, CAA आंदोलन किंवा किसान आंदोलन असो. या आंदोलनातून देशातील सत्ता उलथवून टाकण्याचेच कारस्थान सुरू नव्हते का? पण हाती काय लागले? आज सगळी आंदोलने मागे पडली, परंतु राष्ट्रीय विचारांची सत्ता अबाधित आहे. मुळात बांगलादेश, नेपाळ मधील आंदोलने लोकांचा असंतोष आणि विदेशी शक्तीच्या जोरावर झाली आहेत. भारतात असंतोष नाही. तो निर्माण करण्यासाठी काँग्रेस, डावे लिब्रांडू आणि विदेशी शक्ती सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु ज्या देशात जनतेने बहुमताने सरकार निवडून दिले आहे तिथे असंतोष निर्माण करणे सोपे आहे का?
लोकांनी काँग्रेस सरकार विरोधातील आणि देशात सातत्याने हिंदुविरोधी, राष्ट्रविरोधी शक्तीचा वाढता उन्माद थोपविण्यासाठी आपला असंतोष मतदानातून व्यक्त केला होता. त्याचाच परिणाम 2014, 2019, 2024 मध्ये राष्ट्रीय विचारांची सत्ता आली. देशातील बहुसंख्य जनतेच्या मनात असंतोष आणि राग कोणाविषयी असेल तर तो काँग्रेस, डाव्या आणि पुरोगाम्यांविषयी आहे. ज्यांनी देशाचा इतिहास विकृत केला, चुकीच्या शिक्षण पद्धतीने पिढ्या नासवल्या, देशात फुटीरतावाद वाढवला, देशातील बहुसंख्य हिंदू समाजाची बदनामी केली आणि विदेशी शक्तींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करून देशात दहशतवाद्यांना पूरक भूमिका घेतल्या त्यांच्याविषयी लोकांच्या मनात तीव्र आक्रोश खदखदत आहे. परंतु संविधानिक मार्गाने परिवर्तन घडताना दिसत असल्यामुळे जनता शांत आहे.
विरोधी पक्षात राहून, अनेक ठिकाणच्या सत्ता घालवून सुद्धा काँग्रेस आणि त्यांच्या वैचारिक सल्लागार डाव्या लिब्रांडूना राष्ट्रविरोधी, हिंदू विरोधी कट कारस्थाने थांबवावे वाटत नाही. लोक खरेतर या राष्ट्रविरोधी मानसिकतेला कंटाळले आहेत. देशविरोधी घोषणा अजूनही लोकांना विचलित करत आहेत. देशाच्या सैन्याविषयी अपशब्द काढणाऱ्या आणि त्यांच्या शौर्यावर सातत्याने संशय घेणाऱ्या निलाजऱ्या बालिश वक्तव्यांना लोक विसरले नाहीत. त्यामुळे जे बांगलादेश, नेपाळ, व्हेनेंझुएला पाहून भारतात उलथापालथ करण्याची दिवास्वप्न पाहत आहे ती स्वप्ने त्यांच्यावरच उलटू नये म्हणजे झालं..!
10.01.2026
– कल्पेश जोशी
lekhagni.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा