#"आत्महत्या नव्हे कायरता"#
"जयासी वाटतो जन्माचा दुखवटा
जीवन हे मोठा बोजा वाटे
काम पाहुनिया दिसे ज्या मरण
दु:खासी कारण प्रेम म्हणे"
या ओवी आहेत प. पू. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या.
या चार ओळी कलीयुगीन मानवाला कितीतरी उपदेश करुन जातात.
का अशी वेळ येते की माणसाला आत्महत्या करावी लागते? जो मणुष्य आपल्याला एकीकडे जगण्याची भीक मागताना दिसतो... पण असेही जीवनव्यर्थ करणारे, जीवनमुल्य न जाणणारे, मुर्ख माणसं आज दिसतातच! आत्महत्या म्हणजे स्वत:चा बळी आहे, अपराध आहे, मानव जन्म देणार्या त्या निर्मात्याचा, निसर्गाचा घोर अपमानच आहे आणि अगदी लहाणपणापासुन तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार्या आई वडीलांच्या पोटी येऊन त्यांच्या डोळ्यात पुत्रवियोगाचे अश्रू आणने म्हणजे मणुष्य म्हणुन नामुष्कीची अशी ही बाब आहे. जीवनातील संकटांना घाबरुन जाऊन जीवनज्योत विझवणे म्हणजे एकप्रकारे 'कायरताच' आहे!
हवं ते मिळालं नाही म्हणुन पाय घासत रडणारं हट्ट करणारं लेकरु बघितलंय, जिद्दीने ध्येयप्राप्ती करणारी महापुरुष आम्ही बघितले, स्वत:च्या हातुन कुकर्म झालेल्यांना प्रायश्चित्त घेताना बघितलंय, राष्ट्रासाठी मरणारे वीरपुरुष बघितले पण आज आत्महत्या करणारा अक्कलशुन्य, बेजबाबदार माणुससुद्दा पहायला मिळतो हे आपलं दुर्भाग्यच! आत्महत्येची साधारण कारणे ती काय? तर...अपयश, अपमान, प्रेमभंग, कर्ज, लाचारपणा आणि भीती! जीवनाची ज्योत विझवण्यासाठी ही कारणे खरच एवढी महाभयंकर आणि पुरेशी आहेत काय? अपयश कुणाच्या वाटे नाही आलं? आमचे पुर्वज आम्हाला सांगुन गेले 'अपयश ही यशाची पहिली पायरी होय'. आज इतके शोध लागले, संशोधन झालंय, औषधोपचार सहज उपलब्ध होतात, कमी वेळेत कामं पुर्ण होतात, एकुणच जीवनाला वेग आणि शरीराला आराम आलाय. पुर्वी लोकांना किती संकटांना सामोरे जावे लागे..किती किती आजार...समस्या! पण कधी कोणी आत्महत्या नाही हो केली.
भर दरबारात आचार्य चाणक्यांचा अपमान झाला म्हणुन त्यांनी आत्महत्या केली असती तर चंद्रगुप्ताचा 'सम्राट चंद्रगुप्त' झाला असता का? एवढंच काय तर दिल्ली दरबारात छत्रपती शिवाजीं महाराजांचा कनिष्ठ सरदार शिपायांमध्ये उभे करुन घोर अपमान केला गेला. म्हणुन शिवाजी राजांनी आत्महत्या नाही हो केली. तर प्रतिशोध घेतला! कारण त्यांचा स्वाभीमान जागृत होता. पेशवाईवर कर्जाचा डोंगर असताना बाजीराव पेशव्यांनी लढाया केल्या, निजामाचा पराभव केला, पातशहाला घाम सोडला आणि खंडण्या गोळा केल्या. त्यांचा प्रदेश लुटला. पण गुडघे नाही टेकले. सतत लढत राहीले...सतत प्रयत्नशील ध्येयवादी राहीले.
केवळ भारतच नव्हे तर सगळ्याच देशांमधील ही गहन समस्या बनली आहे. आज जगामध्ये दर वर्षी जवळपास ८ लक्षाहुन अधिक लोक आत्महत्या करतात आणि याहुनही वाईट आणि चिंतेची बाब म्हणजे त्यापेकी १७% म्हणजेच १.३५ लक्ष लोक भारतातीलच आहे. त्यातही दक्षिण भारतातील आत्महत्या करणार्यांची संख्या जास्त आहे. असे म्हणतात ज्या देशात तरुणांची संख्या जास्त त्या देशाला महासत्ता स्थापन करण्यास वेळ लागत नाही. कारण युवाशक्ती हा त्या देशाचा आधार असतो. आज भारतात ५५% पेक्षा जास्त संख्या तरुणांची आहे. पण आत्महत्या करणार्या व्यक्तींमध्ये तरुणांचीच संख्या अधिक आहे! कसा होणार भारत महासत्ता? डाॅ. अब्दुल कलामांचं स्वप्न साकार कसं होणार? देशातील प्रत्येक तरुणाचा हा चिंतनाचा विषय असला पाहीजे. २०१४ साली लग्नासंबंधी समस्यांमुळे ६७७३ तरुणांनी आत्महत्या केल्या. परीक्षेत नापास झाल्यामुळे २४०० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. व्यसनाधीनतेमुळे ३६०० तरुणांनी आत्महत्या केल्या. बेकारीमुळे, नोकरी धंदा न मिळाल्यामुळे २२०० तरुणांनी आत्महत्या केल्या. प्रेमसंबंधी उद्भवलेल्या समस्यांमुळे ४१०० जणांनी तर कौटुंबीक कलहामुळे सर्वात जास्त २८६०० लोकांनी आत्महत्या केल्या. कसा होणार भारत महासत्ता?
आज लोकशाहीत बुद्धीच्या जोरावर अख्ख जग पालथं पाडण्याची ताकद मानवात असताना आत्महत्या का होते? प्रेम आणि हृदय या फक्त संकल्पनाच होऊ शकतात. त्यांना मानवाने एकाच धाग्यात का बांधले कळत नाही. आपल्या शरीरात प्रेम नावाचा अवयव नाही आणि प्रेम करण्यासाठी आवश्यक असं 'मन' नाही.
ज्या व्यक्तीकडे ते आहे तो कदापी अश्या व्यर्थ विचारांना थारा देणारच नाही.
आपल्या शरीरात प्रेम घडवणारं 'संप्रेरके' आणि रक्ताभिसरण करणारं हृदय तेवढं आहे. प्रेम आणि हृदय यांचा भौतिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या परस्परांशी संबंध नाहीच. तसा काल्पनिक समज आपणच करुन घेतला आहे. तसं असतं तर इतर प्राण्यांमध्येसुद्धा हृदय आहेच मग त्यांच्याशी मानवाचं का कधी प्रेमसंबंध दिसत नाही? एवढंच काय तर एखाद्या तरुण मुलाचं आणि वयोवृद्ध आजींचं प्रेमसंबंध कधी ऐकलं किंवा पाहीलंय का? नाही ना? ते शक्यसुद्धा नाही. माझ्यामते 'प्रेम' म्हणजे 'आकर्षण' आहे आणि त्याचे स्रोत म्हणजे 'संप्रेरके' (Hormones) आहेत. त्यामुळे प्रेमात अपयश येणे म्हणजे लगेच आत्महत्या हा मार्ग योग्य नाही.
अपयश, अपमान, लाचारी वगैरे वगैरे परिस्थितीतून जाणार्यांनी ऊन पावसात राबणार्या त्या हमालांकडून शिकावी जीवनाची जीवनाशी जीवनासाठीची लढाई!
तपतपत्या ऊन्हात हातात फाटकी चप्पल घालुन रस्त्यारस्त्यातून स्वत:ला ढकलत घसरत पुढे जात असलेल्या त्या पांगुळ्या भिकार्याकडून शिकावी लाचारीची लढाई!
प्रियकराला किंवा प्रेयसीला 'मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही' असं म्हणण्यापेक्षा ' तुझ्या प्रत्येक श्वासाने माझं आयुष्य वाढणार आहे आणि तू मला मिळो अथवा ना मिळो तुझ्या यशामध्ये माझा आनंद सामावला आहे' असं म्हणनार्या असंख्य प्रेमी युगुलांकडून शिकावं 'प्रेम' म्हणजे काय? प्रेम ही फक्त भावना नाही तर ती जगणं शिकवणारी शक्तीदेखील आहे. आपण फक्त त्या भावनेपर्यंत पोहचायला हवं. दहावीत नापास होणारा आमचा सचिन तेंडूलकर... क्रिकेटचा देव होतो. त्याच्याकडून शिकावी ध्येयपूर्ती..आणि... आई बापाविना पोरके असणारे संत ज्ञानेश्वर आज जगाची माऊली होतात म्हणुन त्यांच्याकडून शिकावं ते 'जीवन महात्म्य!
आत्महत्या करणारी व्यक्ती जगातून जाते पण तिच्यावर प्रेम करणारी असंख्य माणसे जगात असतात. बाबा त्यांच्या मित्रांमध्ये... आॅफीसात आपल्या मुलाचं मुलीचं कौतुक करत असतात, आई तिचं बाळ लहाण असतं तेव्हापासुन त्याच्या भविष्याचे स्वप्ने रंगवत असते...! तो खट्याळ,खोडकर,मस्तीखोर कस्साही असला तरी शेजारपाजार्याकडे आई त्याचे गोडवेच गात असते. आपल्या पोटच्या गोळ्याला ठेच जरी लागली तरी तिचे डोळे पाणावतात! असं असताना त्या आईच्या ममतेच्या पंखाखाली वाढलेलं हे पाखरु काहीही मागचा पुढचा विचार न करता स्वत:च्या गळ्याला फास आवळतं तेव्हा आपल्या लेकराची ही वाईट बातमी त्या आईच्या कानावर पडल्यावर तिच्या काळजाचे तुकडे होत नसतिल का? कालपर्यंत वर्गात धिंगामस्ती करणार्या, एकत्र डबे खाणार्या, कट्ट्यावर गप्पा मारणार्या, त्या मैफिलीतील मित्रांमधील एक जण जेव्हा त्यांना कायमचं सोडून जातो तेव्हा त्यांच्या आठवणी त्या मित्रांनाही जिवंतपणी मारत नसतील का? काही महिन्यांपुर्वीच लग्न करुन सासरी गेलेल्या बहीणीला तिची रक्षा करण्याचं व्रत घेतलेला भाऊराया तिला कायमचा सोडून गेला म्हटल्यावर तिच्या मनावर वज्राघात होत नसतील का? आणि दिवसरात्र...ऊन्हापावसात आपल्या पोरा बाळांसाठी राबणार्या त्या बापाच्या कानी जेव्हा ही कटूवार्ता येत असेल....तेव्हा त्याला मरणांत यातना होत नसतिल का?
आपले आई वडील आपल्याला त्यांच्या म्हातारपणातली काठी मानतात. त्यांची काठी म्हातारपणापुर्वीच मोडली...तर ते भविष्यात सहारा घेतील कश्याचा? याचा का कुणी विचार करत नाही? आत्महत्येची बातमी ऐकल्यावर वाईट जितकं वाटतं ना...तितकीच त्या व्यक्तीविषयी घृणा आणि अनादरसुद्धा वाटतो. हेही त्रिवार सत्य आहे. निसर्गाने प्रत्येक सजिवाची सोय केलेली आहे. जिथे जनावरं कधी उपाशी मरत नाही तिथे माणुस कसा उपाशी राहणार. निसर्गाने प्रत्येकाला वाट दिली आहे...शोधायची फक्त देरी आहे. यश आणि सुखही वाढुनच ठेवलेलं आहे. प्रयत्न योग्य दिशेने केेले तर ध्येय निश्चीतच मिळणार आहे. तसेच, खचलेल्यांना आणि हताश झालेल्यांना प्रत्येकाला उठून उभं करणे म्हणजे माणुसकी. "देवाने मानवाला इतर सजिवांपेॅक्षा वेगळेपण दिलंय ते म्हणजे 'बुद्धी' आणि 'हास्य'! या दोन गोष्टींचा सदुपयोग करुन जीवन यशस्वी केलंत तरच त्याला 'मानव' म्हणता येईल अनथा तो 'कायरच' गणला जाईल!!"
-कल्पेश गजानन जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा